लोड करीत आहे...
नमस्कार मंडळी, मी गणेश गायकवाड या ब्लॉगवर आपले मनापासून स्वागत करतो. हा ब्लॉग वाचून आपला अभिप्राय आवश्य नोंदवा.

रविवार 28 फेब्रुवारी 2010

वाचनाचे महत्त्व...

            डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, "वाचाल तर वाचाल."  वाचनाचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. वाचनाने माणसाचे फक्त मनोरंजन होते असे नाही तर विविध प्रकारच्या माहितीमुळे ज्ञानाचे समृद्धीकरण होते. रोज आपण वर्तमानपत्र वाचतो, एक नव्हे अनेक वर्तमानपत्रे वाचतो, साप्ताहिकांबरोबरच मासिकेही वाचतो. यासर्वांमधून नवनविन घटनांची, नवनविन क्षेत्रातील घडामोडींची, त्याचबरोबर विविध प्रकारच्या साहित्याची माहिती मिळते. वाचनाच्या छंदामुळे, सवयीमुळे स्वत:च्या व्यक्तिमत्त्वात अमुलाग्र बदल घडवून आणता येतो.
           विविध प्रकारच्या  कथा, कादंब-या यांच्या वाचनामुळे लेखकाच्या भावना सर्वसामान्यांपर्यंत पोहचतात. याशिवाय त्या कथेतील पात्रांच्या भूमिकांमधून माणसाच्या विविध गुणांचे दर्शन होते. माणसाचे स्वभावविशेष समजतात. माणसाच्या जीवनशैलींची माहिती मिळते. यातून स्वत:चा व्यक्तिमत्त्व विकास साधता येतो.
           विनोदी साहित्याचे वाचन केल्यामुळे स्वत:च्या दु:खाचा विसर होतो. वाचनाने मनोरंजनाबरोबरच जीवन व्यवहारातील अनेक कौशल्यांची माहिती मिळते.
            वाचनामुळे आपले व्यक्तिमत्त्व अधिक संपन्न होते. दुस-याचे मत, त्याची विचार करण्याची पद्धत लक्षात येते. एखाद्या घटनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन विकसित होतो. जगातील अनेक प्रकारचे लोक आहेत. प्रत्येकाची स्वत:ची अशी जीवनशैली आहे. यामधून जीवन जगण्याचे विविध मार्ग समजतात. एखाद्या प्रश्नावरती चटकन उत्तर सापडते. 
            मानवाला लेखनकला अवगत झाली. तशी वाचनकला ही अवगत झाली. विविध काळात विविध प्रकारचे लेखन झाले. अनेक संस्कती उदयास आल्या. एखाद्या काळातील लिहिल्या गेलेल्या पुस्तकांमधून, ग्रंथांमधून त्या काळातील संस्कतीची, मानवाच्या प्रगतीची माहिती मिळते. घडून गेलेल्या अनेक घटनांचे तात्पर्य समजते. त्या काळातील घटनांचा आजच्या काळातील घटनांशी तुलनात्मक दृष्ट्या पाहून विविध समस्यांवरती मार्ग शोधता येतात.
           वाचनामुळे समाजात ज्ञानाची अनेक कवाडे उघडी झाली. समाजामध्ये ज्ञानाची देवाणघेवाण होऊ लागली. यामुळे ज्ञान हे स्वत:पुरते न राहता दुस-यालाही त्याचा लाभ होऊ लागला आहे. वाचनामुळे ज्ञान प्रगल्भता, संवेदनशिलता, व्यक्तिमत्त्व विकास, वैचारिक दृष्टिकोन, जीवनमुल्ये या सर्व गोष्टींची माहिती होऊन स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगिण विकास साधण्यास मदत झाली आहे.
            वाचनामुळे ज्ञानाचे समद्धीकरण होते. सतत नवनविन माहिती मिळत राहते. जगातील विविध स्तरांशी संपर्क प्रस्थापित करता येतो. स्वत:ची एक अशी जीवनशैली विकसित करता येतो. व्यक्तिमत्त्व विकासासारख्या विषयांवरील पुस्तकांच्या वाचनामुळे जीवनतील अनेक व्यवहांची माहिती होतेच, त्याचबरोबर जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन विकसित होतो. जसे यश मिळविण्यासाठी कशी धडपड करायची हे समजते, तशी अपयश पचविण्याची ताकद आणि पुन्हा यशस्वी होण्याची जिद्दही वाचनातूनच मिळते. 
            जीवनातील अनेक व्यवहारांची अनुभूती देण्याचे सामर्थ्य वाचनातच आहे. मानवाच्या प्रगतीचा आणि सर्वांगीण विकास मार्ग वाचनातूनच सापडतो. म्हणून तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले, " वाचाल तर वाचाल."
                                                            लेखन :- गणेश गायकवाड
           

1 टिप्पणी(ण्या):

sharayu 28 फेब्रुवारी 2010 4-16 pm  

आकलनशक्तीवरील मर्यादा दूर करणे हा वाचनाचा प्रमुख उपयोग आहे असे मला वाटते.

या ब्लॉगवरील माहितीचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत.

  © Blogger templates The Professional Template by Ourblogtemplates.com 2008

Copyright माझ्या मनातलं थोडंसं... वर जाण्यासाठी