आयुष्यभर विद्यार्थी राहा...
" विद्यार्थांसाठी..."
ज्ञान म्हणजे मानवाच्या प्रगतीचे मूळ... माणूस हा आयुष्यंभर विद्यार्थीच असतो. आपल्या सभोवताली असणा-या निसर्ग सृष्टीच्या प्रत्येक गोष्टीतून आपल्याला ज्ञान मिळते. फक्त त्यासाठी आपली आयुष्यंभर विद्यार्थी राहण्याची तयारी हवी. विद्यार्थी बनून राहण्यासाठी आपल्याअंगी एक गुण असणे आवश्यक आहे आणि तो म्हणजे नम्रता...
'विद्या विनयेन शोभते' कितीही ज्ञानसंपन्न माणूस असला आणि जर त्याचे जवळ नम्रता नसेल तर त्याचेजवळचे ज्ञानभांडार भरलेले असतानाही ते रिकामेच आहे. आपल्याला हव्या असणा-या अशा अनेक गोष्टी कदाचित मागूनही मिळणार नाहीत. पण जर आपल्याजवळ नम्रता असेल तर काही अनपेक्षित गोष्टीही आपल्याला न मागताच मिळून जातात.आपली ज्ञानलालसा जेवढी अधिक तेवढे ज्ञान आपण मिळवू शकतो.
फक्त शालेय अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला म्हणजे आपण ज्ञानसंपन्न झालो असे होत नाही. शालेय अभ्यासक्रमातून कदाचित एखाद्या विषयाचा तुमचा सखोल अभ्यास होईलही परंतू फक्त तेवढेच ज्ञान आयुष्यंभरासाठी पुरेल असे होत नाही. जीवनातील अनेक व्यवहारांचे ज्ञान आपल्या दैनंदिन जीवनातील अनेक लहान-मोठ्या घटनांमधून आपल्याला मिळत असते. फक्त त्यासाठी आपला सकारात्मक दृष्टीकोन महत्त्वाचा ठरतो. ब-याचदा आपल्याला माहीत नसलेल्या अनेक लहान सहान गोष्टी एखाद्या लहान मुलालाही माहीत असू शकतात. अशावेळी त्याच्याकडून शिकताना आपल्या वयाचा अडसर बाजूला करून ज्ञान मिळवणे आवश्यक असते.
निसर्ग हा एक गुरू आहे असे म्हटले जाते. कारण निसर्ग त्याच्या अनेक लिलांमधून आपल्याला नवनविन अनुभव देत असतो ज्यामुळे आपले ज्ञानभांडारात वृद्धी होत असते. आपली ज्ञानलालसा जेवढी अधिक तेवढी ज्ञानाची कवाडे आपल्यासाठी मोकळी होतात.
आपल्याला जर ज्ञानसंपन्न व्हायचे असेल तर आयुष्यंभर विद्यार्थी राहण्याची तयारी ठेवा... कितीही ज्ञान मिळाले तरी ज्ञानलालसेला तृप्त होऊ देऊ नका. जीवन जगणे ही एक कला आहे. आयुष्यं खूप सुंदर आहे. ते अधिक सुंदर होण्यासाठी नवनविन गोष्टींची माहिती मिळविण्यासाठी धडपडत राहा.
विद्यार्थीदशेत जर या गोष्टींची सवय लागली तर यशाचे शिखर आपली वाट पाहते आहे यात शंका नाही. ज्ञान मिळवत असताना विद्यार्थीदशेतच योग्य दिशेने विचार करण्याची सवय लागणे आवश्यक आहे. न्यूटनने झाडावरून पडणारे फळ आपल्याला खाण्यासाठी पडले आहे. हा विचार केला असता तर कदाचित गुरूत्वाकर्षणशक्तीचा शोध लागला नसता. प्रगतीचे मूळ जसे ज्ञानात आहे तसे ज्ञानाचे मूळ आपल्या विचारात आहे. म्हणून प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार करा आणि अधिकाधिक ज्ञानसंपन्न व्हा.
लेखन- गणेश गायकवाड






0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा